• Sat. Nov 23rd, 2024

Amrit Today

amrittoday.in

Spread the love

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण

मुंबई, 02 जुलाई 2024

अमृत टुडे । गेल्या काही वर्षांत तापमान वाढ, पर्यावरण असमतोल, अवेळी पाऊस असे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील हरित महाराष्ट्र व्हावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हरित आच्छादित महाराष्ट्र हीच वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कृषी दिन वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळा 2024 आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार निलय नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार इंद्रनील नाईक, राहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, सचिव दीपक पाटील, विश्वस्त डॉ. आनंद पटवर्धन, मुश्ताक अंतुर्ले आदी उपस्थित होते.

This image has an empty alt attribute; its file name is CODE-1-1024x1024-8.jpg

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या योगदानाशिवाय देशाचा किंवा महाराष्ट्राचा उत्कर्ष अशक्य आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे, असे मानणारे राज्य शासन असून त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शेतकरी पुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांच्या श्रमाची, कष्टाची जाणीव होती. अन्नधान्याच्या टंचाईत त्यांनी विविध योजना राबविल्या. संकरित ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यांनी हरित क्रांतीचे स्वप्न पाहिले. हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने मिशन बांबू लागवड सुरू केले आहे. बांबू हे हिरवे सोने असून त्यापासून विविध उत्पादने तयार केले जातात. त्यामुळे राज्यात एकूण २१ लाख हेक्टर क्षेत्रात बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषात बदल केले. शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दुप्पट केली. दोन हेक्टर क्षेत्राऐवजी तीन हेक्टर क्षेत्राचा निकष लागू केला. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानालाही भरपाई मंजूर केली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर सहा हजार रुपयांची मदत सुरू केली. अर्थसंकल्पात सात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल माफ केले आहे. शासनाने विविध निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याबरोबर तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे. वसंतराव नाईक यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना देशाला मार्गदर्शक ठरली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्यात येतो. त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होत आहे.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी पुरस्कार विजेत्यांपासून प्रेरणा घेत अन्य शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करतील, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बारवाले यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले. प्रतिष्ठानचे पुरस्कार विजेते असे : वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार- कन्हय्यालाल बहुउद्देशीय संस्था, रोहोड, ता. साक्री, जि. धुळे. वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प, राहुरी, जि. अहमदनगर. वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार- कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत बी. कलंत्री, नागपूर. वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार- श्रीकांत कुवळेकर, मुंबई. वसंतराव नाईक कृषी निर्यात पुरस्कार- लुकमान इस्माईल शेख, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव. वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार- भीमराव कडू, पार्डी- देशमुख, ता. कळमेश्वर, जि. नागपूर. वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार, मधुकर ईश्वरदास गवळी, मु. पो. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक. वसंतराव नाईक दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार-. दगडू व सौ. कविता लोखंडे, मु. पो. बेवणूर, ता. जत, जि. सांगली. वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार- वैजिनाथ घोंगडे, मु. पो. वाडेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर. वसंतराव नाईक जैवविविधता संवर्धन पुरस्कार, बोरगड राखीव वनसंवर्धन क्षेत्र, बोरगड, जि. नाशिक (राजेश कुरुप, अनमल खान). वसंतराव नाईक आधुनिक फुल शेती पुरस्कार- डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटील, पुणे. वसंतराव नाईक आधुनिक कृषी यंत्र निर्मिती स्टार्टअप पुरस्कार- अजित खर्जुल, मु. पो. एकलहरे, ता. जि. नाशिक. वसंतराव नाईक सामाजिक वनीकरण पुरस्कार- संजीव शशिकांत करपे, मु. पो. पिंगुर्ली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम विकास पुरस्कार- मु. पो. परुळे बाजार, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक नावीण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- राहुल अमृता रसाळ, मु. पो. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर. वसंतराव नाईक नैसर्गिक शेती पुरस्कार- वासुदेव भास्कर गायकवाड, मु. पो. चळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. वसंतराव नाईक कडधान्ये संवर्धन पुरस्कार- शरद सर्जेराव पवार, मु. पो. अहिरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *